Monday, March 28, 2011
कर्तबगारांची नगरी भाग - १ , आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख
Monday, March 21, 2011
फूले अश्रूंची अन् आठवणींची, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख
Monday, March 14, 2011
दामुच्या गोव्याक् वयता भाग-४, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख
Monday, March 7, 2011
दामुच्या गोंव्याक् वयता भाग-३, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी,प्रभाकर पणशीकर यांचा लेख
Monday, February 21, 2011
दामूच्या गोव्याक् वयता... भाग २, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख
Monday, February 14, 2011
दामूच्या गोंव्याक् वयता..., आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख
Monday, February 7, 2011
माझे भाग्यविधाते, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख
Monday, January 31, 2011
-आणि पंतांचा लिहिता हात थांबला!, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
Monday, January 24, 2011
नटवर्य प्रभाकर पणशीकरांचा चाफावरील लेख : नाटकासाठी दशदिशा
काही वर्षांपूर्वी फलटण शुगर फॅक्टरी येथे नाटकाच्या प्रयोगानिमित्त गेलो होतो. स्थानिक मंडळींबरोबर झालेल्या गप्पा-टप्पांत बालगंधर्वाच्या नाटक मंडळींचे पडदे तेथील एका मंदिरात सुव्यवस्थितपणे रूळांवर टांगून ठेवल्याचं कळलं. मोठया कुतुहलानं मी हे पहायला गेलो. तेथील व्यवस्थापकानं मोठया अगत्यानं ते पडदे उलगडून दाखविले. पन्नास-साठ वर्षांपूर्वी चितारलेले ते पडदे, पण त्याचे रंग अजूनही ताजे टवटवीत भासत होते. मी मोठया श्रध्देनं ती अजोड कलाकारी पहात असताना माझे डोळे मात्र अश्रूंनी डबडबले होते. त्या पडद्यांचा नाटयगृहापासून त्या मंदिरापर्यंतचा झालेला प्रवास मोठा क्लेशदायक होता. गंधर्वमंडळींच्या विपन्नावस्थेत ते पडदे एका गुजराथी किराणा व्यापा-याकडे गहाण पडले होते. पुढे कंपन्या बंद पडल्या. त्या व्यापा-याने दिलेल्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता मावळली. पण त्या भल्या गृहस्थानं पडद्याला नुकसान पोहोचवणार नाही अशी खबरदारी घेतली होती. कालांतराने त्याच परिसरात उभ्या राहिलेल्या फलटण शुगर फॅक्टरीने संचालक श्रीमान दादासाहेब आपटे यांना ही हकीकत समजली. ते ताबडतोब त्या किराणा व्यापा-याला भेटले. त्या पडद्यांपोटी झालेला व्यवहार समजावून घेतला आणि त्या गुजराथी व्यापा-याकडून ते पडदे ताब्यात घेतले. आवश्यक ती डागडुजी करून ते पडदे त्या देवळात टांगून ठेवले. नाटकाच्या त्या पडद्यांचा आता तसा व्यावहारीक उपयोग काहीच नव्हता पण एका नटसम्राटानं वापरलेले पडदे जतन करावे या श्रध्दा भावनेनं हे सर्व घडलं होतं. हे सारं ऐकताना माझ्यासमोर १९३० पासूनचा मोठमोठया नाटक कंपन्या कोसळण्याचा काळ उभा राहिला. गंधर्व मंडळींची वाताहात झाली. ‘ललितकला’ ग्वाल्हेर मुक्कामी बंद पडली. तेथेच त्या कंपनीचे मालक बापूराव पेंढारकर यांचं निधन झालं. ग्वाल्हेर नरेशांनी आणि रसिकांनी कंपनीच्या शिक्षापाण्याची तरतूद केली. सर्वांना परतीच्या प्रवासाचे पैसे दिले. दिनानाथारावांच्या बलवंतची स्थिती काही याहून वेगळी नव्हती. फरक असलाच तर फक्त तपशीलात.
Monday, May 24, 2010
अजि म्या तुरुंग पाहिला...
अनेक वर्षं ’तो मी नव्हेच’ चे प्रयोग मी केले. कोर्टाच्या वातावरणाशी अती परिचयात अवज्ञा होण्याइतपत सलगी निर्माण झाली. शब्द्च्छल करुन खोट्याचं खरं भासवायचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी दहा-बारा वर्षाच्या सक्तमजुरीला सामोरा गेलो, त्यासाठी मला मरावंही लागलं. पण प्रत्येकवेळी अहिरावणासारखा माझ्याच रक्ताच्या थेंबातून जिवंत ठेवून पुन्हा सरळ मार्गी माणसांच्या मानगुटीवर मी बसत असे. माझी लखोबा लोखंडेची भूमिका इतकी बेमालूम होत असे की, महाराष्ट्रातील एका मोठ्या पुढा-याने माझ्या डोक्यावरची गांधी टोपी इतकी अलगद उडवली आणि गद्दारी करून त्याच्या पक्षातून बाहेर पडलेल्या दुस-या एका पुढा-याच्या डोक्यावर चढवली. त्यामुळे महाराष्ट्रात दोन ’लखोबा’ निर्माण झाले. मला प्रत्येक प्रयोगात मरून जिवंत व्हावं लागलं. ती दुसरी टोपी मात्र अनेकांच्या डोक्याला फिट बसली. सदानकदा "तो मी नव्हेच" म्हणत आपली गुन्हेगारी आणि पुढारीपण सांभाळत अनेक ’लखोबा’ निर्माण झाले. त्यांच्या भ्रष्ट्राचारी विश्वदर्शनामुळं माझा लखोबा बापुडवाणा ठरला. पण मराठी वाङमयात ’तो मी नव्हेच’ असा वाक्प्रचार रूढ झाला.एकदा नगरला एका खटल्यात मला साक्ष द्यायची होती. नगरला जायचंच, म्हणून आदल्या दिवशी रात्री नगरमध्ये मी ’तो मी नव्हेच’चा प्रयोग केला. ज्यांच्यासमोर माझी केस उभी राहणार होती, त्या न्यायमूर्ती श्रीमती पाटील या प्रयोगाला उपस्थित होत्या. माझी कोर्टातली सर्वांची खिल्ली उडवणं बघून त्या खूप हसल्याही होत्या. पण मनातून रुष्ट झाल्या असाव्यात. दुसरे दिवशी कोर्टात माझं नाव पुकारल्यावर मी साक्षीदाराच्या पिंज-यात जाऊन उभा राहीलो. नाटकातल्या सवयीमुळं मी पिंज-यावर रेलून उभा राहिलो. जज्जबाई ताबडतोब हातोड्यासह कडाडल्या, "हे कोर्ट आहे, नाटक नाही. नीट उभे रहा." आणि नंतरच्या अर्ध्या-पाऊण तासात त्यांनी माझी अक्षरशः चाळणी केली. माझ्या मिश्किल उत्तरांना त्यांनी कोर्टाची अशी जरब बसवली की, ’पुन्हा कोर्टाची पायरी चढणार नाही’ अशी भीष्मप्रतिज्ञा करूनच तिथुन बाहेर पडलो.
’मला काही सांगायचंय’मध्ये मी स्वतःच निवृत्त जज्ज होतो. औरंगजेबच्या भूमिकेत न्यायदान माझ्याच अखत्यारित होतं. ’अश्रुंची झाली फुले’मधील जेल दृश्यामुळं कैद्याची मानसिकता मला कळली होती आणि 'थॅंक्यू मिस्टर ग्लाड’ मधील जेल सुपरिटेण्डन्ट ग्लाडसाहेबामुळं मला तुरूंगातील क्रूर कठोर हडेलहप्पी समजून घेता आली.पण हे सगळं नाटकात, प्रत्यक्षात मी मुंबईतल्या तुरूंगामध्ये दोन-चार रात्री काढल्या आहेत, हे कुणाला खरं वाटेल? पण ते खरं आहे. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू झालं, माझ्या होणा-या सासूबाईंच्या-इंदिराबाई कुलकर्णी यांच्या समाजवादी पक्षामुळे मीही त्यात ओढला गेलो. कॉ.डांगे, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर, कॉ.रेड्डी, शाहिर अमर शेख आदींच्या सहवासात आलो. आचार्य अत्र्यांचा तोफखाना सतत कुठे न कुठे धडधडत असे. तेथील वक्त्यांना गरज पडल्यास पाणी पाजायचं काम माझ्याकडे होतं. अर्थात मोर्चे, घोषणा, पत्रकबाजी हे सगळं आलंच. नुकतच माझं ’भटाला दिली...’ नाटक रंगमंचावर आलं होतं. चांगलं चाललं होतं. पण प्रयोगाव्यतिरिक्त मिळणारा वेळ मी या राजकीय ’ओसरी’वर धुमाकूळ घालत होतो.
एकदा सचिवालयावर मोठा मोर्चा निघणार होता. कापाच्या मैदानावर म्हणजेच आझाद मैदानावर सर्वांनी जमायचं होतं. एक बोरीबंदराकडून व दुसरा फ्लोराफाऊंटन्टकडून सचिवायलयावर मोर्चा काढणार होते. मुख्यमंत्री मोरारजीभाईंची दंडुकेशाही असल्याकारणानं सर्वच कडेकोट बंदोबस्त होता. आमचा मोर्चा क्झेवियर्स कॉलेज, ऎक्सप्लनेड कोर्ट यांच्याजवळ येताच पोलिसांनी दंडुके उभारून आमच्यावर चाल केली. वेगवेगळ्या घोषणा बेंबीच्या देठापासून ओरडण्यात मी पटाईत. पोलीसांचा हल्ला आल्यानंतर, पळापळ सुरू झाली. त्यात कोणाचा तरी पाय लागून मी रस्त्यात आडवा झालो. तेवढ्यात तिथले प्रमुख इन्स्पेक्टर बलसारा आणि दोन हवालदार माझ्या जवळ आले आणि माझ्या हातापायांची झोळी करून, त्यांनी ती जवळच असलेल्या पोलीस व्हॅनमध्ये टाकली. हां हां म्हणता व्हॅन भरली आणि निदर्शकांच्या दगडधोंड्याना न जुमानता आम्हाला भायखळा जेलकडे घेऊन गेली. भायखळ्याचा जेल म्हणजे कोंदट,कुबट. एका मोठ्या सेलमध्ये आम्हा सर्वांना ढकलण्यात आलं. या सगळ्या गडबडीत एक मात्रं झालं. दुस-या दिवशी पोलीसांनी मला उचललेल्या अवस्थेतला फोटो त्या दिवशीच्या ’फ्री प्रेस जर्नलच्या पहिल्या पानावर छापून आला. रात्रभर घरी परत न आल्यामुळं घरी-दारी माझी चौकशी सुरू झाली. रात्रभर ढेकणांच्या सहवासात जागरण झाल्यानंतर आम्हा सर्वांची रवानगी वरळी समुद्रकिना-याजवळील बरॅक्समध्ये झाली- जिथं सध्या आमदारांची गृहसंकुल उभी आहेत. सकाळी प्रातर्विधी उरकल्यानंतर आम्हाला ऍल्युमिनियमच्या टमरेलमधून गरमगरम सोजी प्यायला देण्यात आली. हळूहळू एसेम जोशी, ना.ग.गोरे, आचार्य अत्रे,सेनापती बापट,प्रबोधनकार ठाकरे वगैरे मंडळी भेटून गेली. कोणत्याही परिस्थितीत माफी मगायची नाही, शिक्षा भोगायची असा आमचा निर्धार होता पण हाय, येणा-या रविवारी माझा ’भटाला दिली ओसरी’चा प्रयोग किंग्ज जॉर्जमध्ये जाहीर झाला. तो प्रयोग रद्द होऊ नये म्हणून माझे सासरे ’महाराष्ट्र ग्रंथ भांडार’चे शंकरराव कुलकर्णी यांनी जामिनाची तरतूद केली. किल्ला कोर्टात मला जामीन मिळाला. आमचा प्रयोग झाला. नंतर सर्व निदर्शकांना माफीही मिळाली.
हा प्रसंग आणि फ्री प्रेसमधला तो फोटो मी जपून ठेवला असता तर नंतर आलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णकलशातले काही थेंब माझ्या अंगावर पडले असते. मला ताम्रपटही मिळाला असता. सरकार दरबारी थोडी लाचार धडपड केली असती तर एखाद्या विदेशी मद्याच्या दुकानाचं लायसन्सही पदरात पडलं असतं. आम्हाला पेट्रोलपंप नकोच होता, शैक्षणिक संस्थाही उभारायची नव्हती. साखर, दूध, सूत यांची संस्थाही काढायची नव्हती. तेवढं दारूचं दुकान मिळालं असतं तर मॉगॅंबो खूष झाला असता. चार पिढ्यांची ददात संपली असती. परंतु ’तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ आणि तेच नव्हतं ना!असो!
लेखनसहाय्य : अप्पा कुलकर्णी
मायबाप रसिकहो,
दर आठवड्याला मी माझ्या स्मृति-सागरात बुडी मारून, आपणासाठी एक मोती घेऊन येणार आहे. हा मोती बोरा एवढा टपोरा असेल, जोंधळ्याएवढा बारीकही असेल, गरगरीत गोल असेल, तर ओबड-धोबडही असेल. मोतियाच्या रंगाचा तेजस्वी असेल किंवा कळा गमवलेला तेजहीन असेल. पण असेल तो अस्सल मोतीच.
आयुष्याची उणी-पुरी साठ पासष्ट वर्ष मी रंगभुमीवरच वावरलो. अगदी प्रमुख भूमिकेपासून तो रंगमंचामागील कामगारापर्यंत सर्व भूमिका वठवल्या. क्वचित ठेचकाळलो, पडलो, रक्तबंबाळही झालो. पण, पुन्हा उठून चालू लागलो आणि रसिका, हे सारं आपल्या डोळ्यासमोरच घडलं, या सर्व प्रदीर्घ वाटचालीत अनेक मोठ्या माणसांचं बोट धरून मी चाललो. अनेक लहानांना बोटाला धरून चालविलं. ही सर्व लहान-थोर माणसं या लेखमालेच्या निमित्तानं मला खुणावताहेत, मला स्पर्श कर म्हणाताहेत. अनेक ब-या-वाईट घटना माझ्या भोवती फेर धरून नाचताहेत. या सगळ्याचं शब्दांकन करण्याचा माझा हा प्रामणिक प्रयत्न, गोड मानून घे एवढीच रसिका, तुझ्या चरणी प्रार्थना.कोणाबद्दल कडू-वाईट मी लिहिणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. या सर्व गोष्टींच्या पल्याड मी गेलो आहे. आता ’पैल तीरी काऊ कोकताहे’ अशी माझी अवस्था आहे. पण तरीही मी माणूस आहे, स्खलनशील आहे. माझ्याकडून, प्रसंगी काही कोणाबद्दल कडू-गोड लिहिलं गेलं तर आपण मला क्षमा करालच. पण त्यांनीही मला क्षमा करावी अशी विनंती. एक मात्र नक्की, की आपल्या रंजनासाठी आम्ही ’लटके ना बोलू, सांगू वर्तमान खोटे’. जे असेल ते खरं असेल, तो योगायोग किंवा काल्पनिक आहे असं कोणी समजू नये!
आता पुढच्या आठवड्यात मी माझ्या आठवणीतील पहिला मोती आपणास अर्पण करण्यासाठी येणार आहे. असाच मी वर्षभर येणार आहे. आपणास ह्या मोत्याचा चारा भरवण्याचं श्रेय अर्थातच चाफ़ा.कॉमकडे आहे. मोत्याची झळाळी आणि चाफ़ाचा सुगंध लेवून आता ही मालिका अखंडित चालू रहावी अशी आपण माझ्यावतीनं त्या नियन्त्याकडे प्रार्थना कराल ना? करालच या विश्वासातला
आपला,
प्रभाकर पणशीकर
लेखनसहाय्य : अप्पा कुलकर्णी