Monday, January 24, 2011

नटवर्य प्रभाकर पणशीकरांचा चाफावरील लेख : नाटकासाठी दशदिशा

काही वर्षांपूर्वी फलटण शुगर फॅक्टरी येथे नाटकाच्या प्रयोगानिमित्त गेलो होतो. स्थानिक मंडळींबरोबर झालेल्या गप्पा-टप्पांत बालगंधर्वाच्या नाटक मंडळींचे पडदे तेथील एका मंदिरात सुव्यवस्थितपणे रूळांवर टांगून ठेवल्याचं कळलं. मोठया कुतुहलानं मी हे पहायला गेलो. तेथील व्यवस्थापकानं मोठया अगत्यानं ते पडदे उलगडून दाखविले. पन्नास-साठ वर्षांपूर्वी चितारलेले ते पडदे, पण त्याचे रंग अजूनही ताजे टवटवीत भासत होते. मी मोठया श्रध्देनं ती अजोड कलाकारी पहात असताना माझे डोळे मात्र अश्रूंनी डबडबले होते. त्या पडद्यांचा नाटयगृहापासून त्या मंदिरापर्यंतचा झालेला प्रवास मोठा क्लेशदायक होता. गंधर्वमंडळींच्या विपन्नावस्थेत ते पडदे एका गुजराथी किराणा व्यापा-याकडे गहाण पडले होते. पुढे कंपन्या बंद पडल्या. त्या व्यापा-याने दिलेल्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता मावळली. पण त्या भल्या गृहस्थानं पडद्याला नुकसान पोहोचवणार नाही अशी खबरदारी घेतली होती. कालांतराने त्याच परिसरात उभ्या राहिलेल्या फलटण शुगर फॅक्टरीने संचालक श्रीमान दादासाहेब आपटे यांना ही हकीकत समजली. ते ताबडतोब त्या किराणा व्यापा-याला भेटले. त्या पडद्यांपोटी झालेला व्यवहार समजावून घेतला आणि त्या गुजराथी व्यापा-याकडून ते पडदे ताब्यात घेतले. आवश्यक ती डागडुजी करून ते पडदे त्या देवळात टांगून ठेवले. नाटकाच्या त्या पडद्यांचा आता तसा व्यावहारीक उपयोग काहीच नव्हता पण एका नटसम्राटानं वापरलेले पडदे जतन करावे या श्रध्दा भावनेनं हे सर्व घडलं होतं. हे सारं ऐकताना माझ्यासमोर १९३० पासूनचा मोठमोठया नाटक कंपन्या कोसळण्याचा काळ उभा राहिला. गंधर्व मंडळींची वाताहात झाली. ‘ललितकला’ ग्वाल्हेर मुक्कामी बंद पडली. तेथेच त्या कंपनीचे मालक बापूराव पेंढारकर यांचं निधन झालं. ग्वाल्हेर नरेशांनी आणि रसिकांनी कंपनीच्या शिक्षापाण्याची तरतूद केली. सर्वांना परतीच्या प्रवासाचे पैसे दिले. दिनानाथारावांच्या बलवंतची स्थिती काही याहून वेगळी नव्हती. फरक असलाच तर फक्त तपशीलात.

पुढील भाग वाचण्यासाठी भेट द्या. चाफा सदर

No comments: