Monday, May 24, 2010

अजि म्या तुरुंग पाहिला...

कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण माझ्या आयुष्याची उणी-पुरी चाळीस-पन्नास वर्षे कोर्ट-कचे-या लॉकअप, सक्तमजुरी भोगण्यात गेली, गंमत म्हणजे याच काळात मी न्यायदानही केलं आणि गुन्हेगारांना कडकपणे शिक्षा भोगायला लावल्या. असा मी कोर्टापासून तुरूंगापर्यंत आणि तुरुंगापासून गुन्हेगारांपर्यंत आयुष्यभर खो-खो खेळत राहिलो. पण प्रत्यक्ष आणि नाटक यात ख-या-खोट्याइतकं अंतर असतं. आणि ते अंतर तसंच राहतं.

अनेक वर्षं ’तो मी नव्हेच’ चे प्रयोग मी केले. कोर्टाच्या वातावरणाशी अती परिचयात अवज्ञा होण्याइतपत सलगी निर्माण झाली. शब्द्च्छल करुन खोट्याचं खरं भासवायचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी दहा-बारा वर्षाच्या सक्तमजुरीला सामोरा गेलो, त्यासाठी मला मरावंही लागलं. पण प्रत्येकवेळी अहिरावणासारखा माझ्याच रक्ताच्या थेंबातून जिवंत ठेवून पुन्हा सरळ मार्गी माणसांच्या मानगुटीवर मी बसत असे. माझी लखोबा लोखंडेची भूमिका इतकी बेमालूम होत असे की, महाराष्ट्रातील एका मोठ्या पुढा-याने माझ्या डोक्यावरची गांधी टोपी इतकी अलगद उडवली आणि गद्दारी करून त्याच्या पक्षातून बाहेर पडलेल्या दुस-या एका पुढा-याच्या डोक्यावर चढवली. त्यामुळे महाराष्ट्रात दोन ’लखोबा’ निर्माण झाले. मला प्रत्येक प्रयोगात मरून जिवंत व्हावं लागलं. ती दुसरी टोपी मात्र अनेकांच्या डोक्याला फिट बसली. सदानकदा "तो मी नव्हेच" म्हणत आपली गुन्हेगारी आणि पुढारीपण सांभाळत अनेक ’लखोबा’ निर्माण झाले. त्यांच्या भ्रष्ट्राचारी विश्वदर्शनामुळं माझा लखोबा बापुडवाणा ठरला. पण मराठी वाङमयात ’तो मी नव्हेच’ असा वाक्प्रचार रूढ झाला.

एकदा नगरला एका खटल्यात मला साक्ष द्यायची होती. नगरला जायचंच, म्हणून आदल्या दिवशी रात्री नगरमध्ये मी ’तो मी नव्हेच’चा प्रयोग केला. ज्यांच्यासमोर माझी केस उभी राहणार होती, त्या न्यायमूर्ती श्रीमती पाटील या प्रयोगाला उपस्थित होत्या. माझी कोर्टातली सर्वांची खिल्ली उडवणं बघून त्या खूप हसल्याही होत्या. पण मनातून रुष्ट झाल्या असाव्यात. दुसरे दिवशी कोर्टात माझं नाव पुकारल्यावर मी साक्षीदाराच्या पिंज-यात जाऊन उभा राहीलो. नाटकातल्या सवयीमुळं मी पिंज-यावर रेलून उभा राहिलो. जज्जबाई ताबडतोब हातोड्यासह कडाडल्या, "हे कोर्ट आहे, नाटक नाही. नीट उभे रहा." आणि नंतरच्या अर्ध्या-पाऊण तासात त्यांनी माझी अक्षरशः चाळणी केली. माझ्या मिश्किल उत्तरांना त्यांनी कोर्टाची अशी जरब बसवली की, ’पुन्हा कोर्टाची पायरी चढणार नाही’ अशी भीष्मप्रतिज्ञा करूनच तिथुन बाहेर पडलो.

’मला काही सांगायचंय’मध्ये मी स्वतःच निवृत्त जज्ज होतो. औरंगजेबच्या भूमिकेत न्यायदान माझ्याच अखत्यारित होतं. ’अश्रुंची झाली फुले’मधील जेल दृश्यामुळं कैद्याची मानसिकता मला कळली होती आणि 'थॅंक्यू मिस्टर ग्लाड’ मधील जेल सुपरिटेण्डन्ट ग्लाडसाहेबामुळं मला तुरूंगातील क्रूर कठोर हडेलहप्पी समजून घेता आली.

पण हे सगळं नाटकात, प्रत्यक्षात मी मुंबईतल्या तुरूंगामध्ये दोन-चार रात्री काढल्या आहेत, हे कुणाला खरं वाटेल? पण ते खरं आहे. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू झालं, माझ्या होणा-या सासूबाईंच्या-इंदिराबाई कुलकर्णी यांच्या समाजवादी पक्षामुळे मीही त्यात ओढला गेलो. कॉ.डांगे, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर, कॉ.रेड्डी, शाहिर अमर शेख आदींच्या सहवासात आलो. आचार्य अत्र्यांचा तोफखाना सतत कुठे न कुठे धडधडत असे. तेथील वक्त्यांना गरज पडल्यास पाणी पाजायचं काम माझ्याकडे होतं. अर्थात मोर्चे, घोषणा, पत्रकबाजी हे सगळं आलंच. नुकतच माझं ’भटाला दिली...’ नाटक रंगमंचावर आलं होतं. चांगलं चाललं होतं. पण प्रयोगाव्यतिरिक्त मिळणारा वेळ मी या राजकीय ’ओसरी’वर धुमाकूळ घालत होतो.

एकदा सचिवालयावर मोठा मोर्चा निघणार होता. कापाच्या मैदानावर म्हणजेच आझाद मैदानावर सर्वांनी जमायचं होतं. एक बोरीबंदराकडून व दुसरा फ्लोराफाऊंटन्टकडून सचिवायलयावर मोर्चा काढणार होते. मुख्यमंत्री मोरारजीभाईंची दंडुकेशाही असल्याकारणानं सर्वच कडेकोट बंदोबस्त होता. आमचा मोर्चा क्झेवियर्स कॉलेज, ऎक्सप्लनेड कोर्ट यांच्याजवळ येताच पोलिसांनी दंडुके उभारून आमच्यावर चाल केली. वेगवेगळ्या घोषणा बेंबीच्या देठापासून ओरडण्यात मी पटाईत. पोलीसांचा हल्ला आल्यानंतर, पळापळ सुरू झाली. त्यात कोणाचा तरी पाय लागून मी रस्त्यात आडवा झालो. तेवढ्यात तिथले प्रमुख इन्स्पेक्टर बलसारा आणि दोन हवालदार माझ्या जवळ आले आणि माझ्या हातापायांची झोळी करून, त्यांनी ती जवळच असलेल्या पोलीस व्हॅनमध्ये टाकली. हां हां म्हणता व्हॅन भरली आणि निदर्शकांच्या दगडधोंड्याना न जुमानता आम्हाला भायखळा जेलकडे घेऊन गेली. भायखळ्याचा जेल म्हणजे कोंदट,कुबट. एका मोठ्या सेलमध्ये आम्हा सर्वांना ढकलण्यात आलं. या सगळ्या गडबडीत एक मात्रं झालं. दुस-या दिवशी पोलीसांनी मला उचललेल्या अवस्थेतला फोटो त्या दिवशीच्या ’फ्री प्रेस जर्नलच्या पहिल्या पानावर छापून आला. रात्रभर घरी परत न आल्यामुळं घरी-दारी माझी चौकशी सुरू झाली. रात्रभर ढेकणांच्या सहवासात जागरण झाल्यानंतर आम्हा सर्वांची रवानगी वरळी समुद्रकिना-याजवळील बरॅक्समध्ये झाली- जिथं सध्या आमदारांची गृहसंकुल उभी आहेत. सकाळी प्रातर्विधी उरकल्यानंतर आम्हाला ऍल्युमिनियमच्या टमरेलमधून गरमगरम सोजी प्यायला देण्यात आली. हळूहळू एसेम जोशी, ना.ग.गोरे, आचार्य अत्रे,सेनापती बापट,प्रबोधनकार ठाकरे वगैरे मंडळी भेटून गेली. कोणत्याही परिस्थितीत माफी मगायची नाही, शिक्षा भोगायची असा आमचा निर्धार होता पण हाय, येणा-या रविवारी माझा ’भटाला दिली ओसरी’चा प्रयोग किंग्ज जॉर्जमध्ये जाहीर झाला. तो प्रयोग रद्द होऊ नये म्हणून माझे सासरे ’महाराष्ट्र ग्रंथ भांडार’चे शंकरराव कुलकर्णी यांनी जामिनाची तरतूद केली. किल्ला कोर्टात मला जामीन मिळाला. आमचा प्रयोग झाला. नंतर सर्व निदर्शकांना माफीही मिळाली.

हा प्रसंग आणि फ्री प्रेसमधला तो फोटो मी जपून ठेवला असता तर नंतर आलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णकलशातले काही थेंब माझ्या अंगावर पडले असते. मला ताम्रपटही मिळाला असता. सरकार दरबारी थोडी लाचार धडपड केली असती तर एखाद्या विदेशी मद्याच्या दुकानाचं लायसन्सही पदरात पडलं असतं. आम्हाला पेट्रोलपंप नकोच होता, शैक्षणिक संस्थाही उभारायची नव्हती. साखर, दूध, सूत यांची संस्थाही काढायची नव्हती. तेवढं दारूचं दुकान मिळालं असतं तर मॉगॅंबो खूष झाला असता. चार पिढ्यांची ददात संपली असती. परंतु ’तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ आणि तेच नव्हतं ना!असो!

लेखनसहाय्य : अप्पा कुलकर्णी

No comments: