हल्ली हिंदी सिनेमात आपण खूपवेळा वैतागलेल्या हिरोच्या तोंडी ‘दिमाग का दही मत बनाना’ असे शब्द प्रयोग ऐकलेले आहेत. तसेच हल्लीच्या तरूणांच्या तोंडी मनासारखी गोष्ट घडल्यावर ‘सही मे दही’ असे बोली भाषेतले वाक्प्रचारही ऐकलेले आहेत, परंतु खरे तर ‘दही है सही’ असेच म्हणायला हवे, असा या दुग्धजन्य पदार्थाचा महिमा आहे.
मराठीतही एखादी गोष्ट बिघडली की ‘विरजण पडले’ असा शब्द प्रयोग आपण करतो, परंतु दुधासारख्या पूर्णान्नात विरजण पडल्यावर, त्याचे असे पौष्टीक व सुपाच्य रूपांतर होते हे खरेच अजब आहे. दह्याची पौष्टीकता व आहारमूल्ये दुधासारखीच असली तरी विरजण लावण्याच्या प्रक्रियेत दुधातील लॅक्टोज या साखरेचे (कर्बोदकाचे) लॅक्टिक आम्लात (Lactic Acid) रूपांतर होते. त्यामुळे दही हे दुधापेक्षा थोडे आंबट परंतु चवदार लागते. ते पचायला दुधापेक्षा खूपच हलके असते, इतके की साधे दूध प्यायल्यानंतर एका तासात ते ३५ टक्के पचलेले असते तर दही ९० टक्के पचलेले असते. दह्याच्या आम्लतेमुळे कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, इत्यादी खनिजांचे अभिशोषण सुलभतेने होते. दह्यात प्रथिने, जीवनसत्वे खनिजे भरपूर असतात, व त्यातली प्रथिने पचायला दुधापेक्षा हलकी असतात. म्हणून बेताची पचन शक्ती असणा-यांना, वृध्दांना व लहान मुले यांच्यासाठी दही चांगले. दुधाचे दही बनताना त्यातील आवश्यक व उपयुक्त बॅक्टेरिया त्यातील प्रथिनांना सुपाच्य, पूर्वपाचित बनवतात. आतडयात गेल्यावर त्यातील हानीकारक जंतूंना हे बॅक्टेरिया नष्ट करतात व पचनास उपयोगी व आवश्यक अशा बॅक्टेरियाची वाढ करतात. लॅक्टिक आम्लामुळे कार्बनडायऑक्साइडचा चयापचय नीट होतो, शरीरातील पाणी मूत्रावाटे निघून जात नाही, त्यामुळे पचनसंस्थेतील आम्लाधिष्ठित समतोलावर काही परिणाम होत नाही, दह्यामुळे पेप्सिन, रेनिन व हायड्रोक्लोरिक हे द्राव अधिक स्त्रवतात.
No comments:
Post a Comment