Monday, February 7, 2011

मोदक

साहित्य:

१) नारळ २
२) तांदुळाची पिठी
३) गूळ १॥ वाटी
४) मैदा २ चमचे
५) साखर अर्धी वाटी
६) तेल २ टेबलस्पून
७) वेलदोडे १०-१२
८) मीठ

पूर्वतयारी:
१. मोदक करायच्या आधी आंबेमोहोर अथवा बासमती तुकडा तांदुळ धुवून फडक्यावर वाळवून बारीक पिठी दळून आणावी.
२. नंतर ती पिठी मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावी. दोन नारळ खवून त्यात गूळ व अर्धी वाटी साखर घालावी.
३. ते सारण गॅसवर शिजवून घ्यावे. बोटाला चिकट लागले की उतरवावे.
४. त्यात वेलदोडा पूड घालून सारण तयार ठेवावे. फार कोरडे होता कामा नये.
५.एका जाड बुडाच्या कल्हईत पितळी पातेल्यात २ भांडी पाणी, २ टेबलस्पून तेल घालून गॅसवर उकळण्यास ठेवावे. उकळी आली की चिमूटभर मीठ टाकावे व २ भांडी भरून तांदुळाची पिठी व २ चमचे मैदा घालून गॅस मंद करून चांगले ढवळावे.
६. मंद गॅसवर उकडीला चांगल्या दोन वाफा द्याव्यात व गॅस बंद करावा.

कृती:
१. उकड गरम असताना परातीत काढून पाण्याच्या हाताने खूप मळावी. लिंबाएवढा उकडीचा गोळा घ्यावा व दोन्ही हाताने बाजूने दाबत जाऊन वाटीचा आकार द्यावा.
२. मध्ये पातळ करू नये. मग सर्व बाजूंनी दोन बोटाने दाबून चांगल्या मुख-या पाडाव्यात.
३. तयार झालेल्या वाटीत एक चमचा सारण भरावे. व हाताने मुख-या न मोडता मोदकाचे तोंड बंद करावे.
४.  असे ८-१० मोदक करावेत. मोदकपात्रावर चाळणीत मलमलचे कापड भिजवून पिळून घालावे.
५.मोदकपात्रात पाणी घालून गॅसवर ठेवावे. चाळणीत फडक्यावर तयार केलेले मोदक घालून १५ मिनिटे उकडावेत.
६. उकडलेले मोदक काढून घेऊन, चाळणीत नंतर तयार झालेले मोदक ठेवून उकडावेत. असे सर्व मोदक उकडून घ्यावेत.

वरील साहित्यात २१ ते २२ मोदक होतात.

टिप:
१. मोदक साजूक तूपाबरोबर वाढावेत. रंगीत हवे असल्यास निम्म्या उकडीत केशरी रंग घालावा व निम्मी उकड पांढरी ठेवावी. दोन्हीचा थोडा थोडा गोळा एकत्र करून मोदक करावा.

द्क्षता:
१. पिठी उत्तम तांदुळाची घ्यावी. तांदुळ नवा असावा म्हणजे उकड चिकट होते. फार जुना तांदुळ घेऊ नये. बासमती तुकडा तांदुळाच्या पिठीची उकड चिखट व सुवासिक होते.
२. सारण ओलसर चांगले लागते व गूळ घालूनच करायची पद्धत आहे.
३. मोदक हाताने वळणे जमले नाही तर प्लॅस्टीकच्या कागदाला तेल-पाण्याचे हात लावून त्यावर उकडीचा गोळा ठेवून हाताने गोल पुरीएवढे थापावे व मग हातावर घेऊन मुख-या पाडाव्यात. मोदक चांगले वळले जातात.
४. मोदक उकडण्याकरता ठेवताना पाण्याचा हात लावून ठेवावा व उकडल्यावर फडक्यावरून काढताना पाण्याचा हात लावून काढावा म्हणजे फुटत नाही.
५. मोदकपात्र नसेल तर मोठया पातेलीत स्टॅंडवर चाळणी ठेवून मोदक उकडावेत.
६. स्टॅंडवर किंवा चाळणीवर मोदक उकडायला ठेवताना मलमलच्या कापडाऐवजी बटरपेपर ठेवावा म्हणजे मोदक चिकटणार नाहीत.
७. जास्त मोदक करायचे असल्यास वरील प्रमाणात जास्त प्रमाण वाढवून उकड काढावी व उकडीचे पातेले दुस-या मोठया पातेल्यात उकळीचे पाणी घेऊन त्यात ठेवावे म्हणजे उकड सतत कोमट राहील. १० मोदकांना १ भांडभर पिठीची उकड लागते. जेवढे मोदक करायचे असतील त्या प्रमाणात पिठी व पाणी घ्यावे.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या http://chapha.com/Swad/Aahar_Detail.aspx?Cate_Code=0&ItemCode=103










No comments: