Saturday, March 19, 2011

पुरणपोळी

साहित्य:


१) हरभरा डाळ         ३ वाटया                  ६) जायफळ             अर्धे
२) चिरलेला गूळ      ३ वाटया                 ७) वेलदोडे                 ५-६
३) साखर                 १ वाटी                     ८) कणीक                ३ वाटया
४) मैदा                    ३ टेबलस्पून            ९) मीठ                    चीमूटभर
५) तेल                    पाऊण वाटी            १०) तांद्ळाची पिठी

पूर्वतयारी:
१. हरभरा डाळ स्वच्छ निवडून धूवून शिजवणे.
२. प्रेशर कुकरमध्ये शिजवायची असल्यास सेपरेटरमध्ये ३ वाटी डाळीला ५ वाटया पाणी घालून पूर्ण प्रेशर आल्यावर ५ मिनिटे गॅस बारीक करून बंद करणे.
३. शिजलेली डाळ चाळणीवर उपसून पाणी काढून घेणे. हे केल्याने पोळी हलकी होते.
४. डाळ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालून थोडी डावाने घोटावी. त्यात गूळ व साखर घालून शिजवायला ठेवावी.
५. शिजलेले पुरण गॅसवरून उतरवून त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालून गरम असतानाच पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
६. कणीक व मैदा चाळणीने चाळून त्यात चीमूटभर मीठ, पाव वाटी तेल टाकून कणीक २ तास भिजत ठेवावी.
७. कणीक भिजल्यावर परातीत काढून पाणी लावून हाताने चांगली तिंबावी.पाण्याबरोबर वारंवार तेलाचा वापर करावा.कणीक चांगली मळून सैल झाली पाहिजे.

कृती:

१. वाटलेले पुरण हाताने सारखे करून द्यावे. तांद्ळाची पिठी हाताला लावून मळलेल्या कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यावा.
२. साधारण कणकेच्य़ा गोळ्याच्या दूपटीपेक्षा जास्त पुरण घेऊन हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे व उंडा हाताने बंद करावा.
३. पोलपाटावर पिठी घेऊन हलक्या हाताने पोळी लाटावी व मंद आचेवर तव्यावर गुलाबी सारखे डाग पडेपर्यत भाजावी. ह्याच रीतीने सर्व पोळ्या कराव्यात.

द्क्षता:

१. पुरण शिजवण्याआधी डाळ उत्तम शिजलेली हवी.बोटावर दाबून पहावी. चांगली शिजली नसेल तर गूळ घातल्यावर कडक होते.
२. पुरणात थोडी साखर घालावी. गोडी चांगली येते व पुरण लवकर आळते.
३.. कणीक पुरेशी सैल झाली नाही तर पोळ्या जड व कडक होतात.
४. पुरण वाटण्यापूर्वी जायफळ, वेलदोडे पूड घालावी म्हणजे सगळीकडे नीट लागते.
५. पुरणपोळी करायला पुरण आदल्या दिवशी शिजवून वाटून ठेवावे. पातेले पाण्यात घालून ठेवले तरी चालते, फ़्रिजमध्ये ठेवायची जरूर नाही.
६. पोळी तव्यावर टाकल्यावर वारंवार उलटू नये. एका बाजूने टाकून फुगून आली म्हणजेच उलटवून दुस-या बाजूने भाजावी. वारंवार उलटल्याने पोळ्या मोडतात.
७. पुरण सैल वाटले तर मलमलच्या फडक्यावर टाकावे. फडके पाणी शोषून घेते व पुरन फुटफुटीत होते.
८. पुरण जास्त घट्ट वाटले तर कोरडे होते व पोळी झाली की पुरण बाहेर येते. अशा वेली दूध अथवा कटाच्या पाण्याच्या हाताने सारखे मळून घ्यावे.

वरील साहित्यात मध्यम आकाराच्या १५ ते १६ पोळ्या होतात, पाच सहा व्यक्तींना जेवणात पुरतात.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: