Tuesday, May 25, 2010

लसण्या

आपण धारण करीत असलेल्या प्रत्येक रत्नाचं आयुष्य किमान दोन कोटी वर्ष आहे. ऎकून दचकलात ना. रत्नांबद्दलची अशी खुप चमत्कारिक माहिती मी आपणाला या लेखमालेत देणार आहे. रत्नं बनतात कशी असा मूलभूत प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावत असतो. रत्न म्हणजे मूलतः मिनरल असतात. अनेक मिनरल एकत्र येतात तेव्हा दगड बनतात. म्हणजे सगळे दगड म्हणजे रत्न काय? तर नाही! कारण रत्न मौल्यवान असतात, ती सुंदर दिसतात, ती दुर्मिळ असतात आणि ती टिकाऊ असतात. एकूण तीन हजार ८२३ मिनरल माणसाला ज्ञात आहेत. मग सगळेच मिनरल म्हणजे रत्नं काय? तर नाही! त्यापैकी जेमतेम ७० मिनरलना रत्नांचा दर्जा मिळतो. बाकीचे मिनरल ठिसूळ असतात. सहज उपलब्ध होतात किंवा सुंदर नसतात. थोडक्यात रत्न म्हणण्याचा लायकीची नसतात.

आपणाला माहीत आहे की प्रत्येक पदार्थ अणूंचा बनलाय. मिनरलचे असे अणू पृथ्वीच्या पोटात एकत्र येतात. पृथ्वीच्या पोटातील दाब, उष्णता आदींचा संस्कार त्यांच्यावर होऊन या अणूंपासून एकजीव, विशिष्ट भौमितिक रचना असलेला, भौतिक-रासायनिक-प्रकाशीय गुणधर्म एक असलेला पदार्थ तयार होतो त्याला म्हणतात क्रिस्टल. हे क्रिस्टल म्हणजे बहुधा रत्न असतं. गंमत सांगतो. प्रत्येक रत्नाचा क्रिस्टल मग तो एक फुटाचा असो की पाच फुटाचा एका विशिष्ट आकारतच तयार होतो. म्हणजे पाचूचा क्रिस्टल असेल तर तो षटकोनीच बनतो. तो कधीही चौकोनी किंवा त्रिकोणी बनत नाही. माणिकचं क्रिस्टल नेहमी ट्रायगोनल किंवा ढोलकीच्या आकारातच बनेल. ते कधीही चौकोनी, षट्कोनी बनणार नाही. सगळे मिनरल त्यांचे आकार आणि भौमितीक अक्षांच्या निकषावर सात सिस्टिमम्ध्ये विभागले जाताअत. याला क्रिस्टेलोग्राफी असं म्हणतात. या सात सिस्टिम म्हणजे १) क्युबिक सिस्टिम २) हेग्झॅगोनल सिस्टिम ३)ट्रायगोनल सिस्टिम ४)ट्रेट्रॅगोनल ५) ऑर्थोरोम्बिक ६) मोनोक्लिनिक आणि ७) ट्रायक्लिनिक सिस्टिम पृथ्वीची पोटात चालणारी ही प्रक्रिया अजैविक असते. म्हणजे कोणत्याही जीवाचा त्यात संबंध नसतो. पण कधीकधी जैविक प्रक्रियेतूनही रत्न तयार होतात. या रत्नांचे क्रिस्टल नसतात. या रत्नांना ऍमॉर्फस म्हणतात. उदा. मोती, अंबर, जेड, पोवळं, ओपल वगैरे. रत्नांची उर्वरित शास्त्रीय माहिती पुढील लेखात पाहू. आता ज्योतिषीय माहितीकडे वळू.

आपण वर बघितलं की जेमतेम ७० मिनरलना रत्नाचा दर्जा प्राप्त झालाय. त्यातही जेमतेम १५ ते २० रत्नं मौल्यवान आहेत कारण त्यांना ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. बाकी रत्नं फक्त अलंकारपुरती-शोभेपुरती मर्यादित आहेत.

ज्योतिषीय रत्नांपैकी केतुच्या रत्नाची म्हणजेच लसण्या या रत्नाची माहिती आपण आज घेणार आहोत. लसण्याची माहिती पहिल्यांदा घेण्याचं कारण असं की लसण्या धारण केलेल्या ९९ टक्के लोकांच्या बोटातील रत्नं हे मुळात लसण्या नसतंच. पुन्हा दचकलात?... चला स्पष्ट करून सांगतो...

काही रत्नांच्या आत सुईसारख्या पदार्थाचं जाळं असतं. या जाळ्यांवरून प्रकाशाचं परावर्तन होतं. अशी रत्नं कॅबाशॉन (पोटा) आकारात कापली की त्यांच्या पृष्ठभागावर प्रकाशाची रेघ दिसते. याला चॅटोयन्सी किंवा कॅटस आय इफेक्ट म्हणतात. आता चॅटोयन्सी दाखवणारी एकूण १३ रत्न आहेत. त्यांची नावे सांगतो.
१)सायमोफेन(क्रायसोबेरिल) २)क्वार्ट्झ कॅट्स आय ३) इन्स्टॅटाईट ४)अलेक्झांड्राईट ५)डायोप्साईड ६)मूनस्टोन ७)झरकन ८)कोर्नरपाईन ९) सिलिमनाईट १०) टुर्मलीन ११)स्कॅपोलाईट १२) अपेटाईट १३) आयोलाईट

आता यातील प्रत्येक रत्नं म्हणजे लसण्या काय? तर अजिबात नाही!...फ़क्त सायमोफेन हेच रत्नं म्हणजे लसण्या. पण मार्केटमध्ये काय दिसतं, तर सरसकट क्वार्टझ कॅट्स आय हे रत्न लसण्या म्हणून विकलं जातं. या रत्नाची औकात असते पाच रुपये ते १०० रुपये प्रतिकॅरेट. हजार ते चार हजार रुपये कॅरटप्रमाणं हे रत्न सरबाजारात विकलं जातं. बघा तुमच्या खिशाला चाट किती बसतोय ते. शिवाय लसण्याच्या नावाखाली भलतंच रत्न आपण धारण असल्यानं त्याचा ज्योतिषशास्त्रदृष्ट्या फायदा शून्य. लक्षात घ्याकी ज्योतिषी किंवा व्यापारी जेमॉलॉजिस्ट नसतात. त्यांना रत्नाची पारख करता येणं शक्यच नाही. त्यांना रत्नाबद्दल फक्त एकच गोष्ट माहीत असते ती म्हणजे त्याचा रंग. आता समजा पिवळ्या रंगाचं हेलिऑडर रत्न, पिवळ्या रंगाचं टोपाझ रत्नं, पिवळ्या रंगाचं सिटरिन क्वार्टझ रत्नं, पिवळ्या रंगाचं झरकन रत्नं, पिवळ्या रंगाचं टुर्मलिन रत्नं, पिवळ्या रंगाचं क्युबिक झिरकोनिया, पिवळ्या रंगाची काच यापैकी काहीही त्यांच्या हातवर ठेवलं तर त्याला ते पुष्कराज म्हणतील. आता वर उल्लेख केलेले हे सगळे पिवळ्या रंगाचे आयटेम पन्नास पैसे ते पन्नास रूपये प्रतिकॅरेट या दरम्यान असतात.. पण पुष्कराजचं लेबल लागलं की त्याची किंमत होते पाच हजार रुपये प्रतिकॅरेट. सरसकट ज्योतिष किंवा व्यापारी यांना तुम्हाला फसवायचं असतं असं मला मुळीच म्हणायचं नाहीये. ते हे जाणूनबुजून करीत नसावेत. त्यांच्या अज्ञानामुळे ते स्वतः फसतात आणि त्याची किंमत ग्राहक म्हणून तुम्हालाही मोजावी लागते. असो!

लसण्या हे अपारदर्शक किंवा अंशतः पारदर्शक असणारं रत्न आहे. किंचित हिरवट पांढरा रंग व सोनेरी किंवा पिवळी झाक आणि त्यावर प्रकाशाची अगदी पातळ आणि स्पष्ट रेघ असं त्याचं रुप असतं. वरून टॉर्च मारली आणि हलवली किंवा हे रत्न बोटाच्या चिमटीत धरून हलवलं तरी ही रेघही हलते. ही रेघ हलत नसेल तर ते रत्न सिन्थेटिक आहे असं समजावं.

लसण्याचं ज्योतिष
नष्ट लक्ष्मी परत आणण्याचं सामर्थ्य फक्त लसण्यात आहे. हे रत्नं धारण केल्यास इन्ट्युशन पॉवर वाढते. स्टॅमिना, आरोग्य यांचा लाभ होतो. भूतप्रेत काळी विद्या यांपासून बचाव होतो. अपघात किंवा गंडांतर टाळता येतं. माझा ज्योतिषशास्त्रातला अनुभव सांगतो की नीलम या रत्नांनतर सर्वात वेगानं घटना घडवणारं दुसरं कोणतं रत्न असेल तर ते लसण्या. म्हणून ट्रायल पिरियड घेतल्याशिवाय हे रत्न वापरू नये.

केतु हा ग्रह म्हणजे पूर्वजन्माचं संचित आहे शिवाय मोक्षाचा कारक आहे. अध्यात्मिक उन्नती आणि विरक्ती अशा दोन्ही फळांचा मुख्य कारक म्हणजे केतु. कोणत्याही दैवी शास्त्रात (ज्योतिष, वास्तु, तंत्र-मंत्र, काळी विद्या वगैरे) तुम्हाला यश मिळेल की नाही हे पत्रिकेतील केतु निश्चित करतो. भुतखेत, सततची वाईट स्वप्नं, सततचा प्रवास, भाजणं-कापणं, काळसर्पयोग, सर्पदोष यांचा कारकही केतु. केतु पत्रिकेत वाईट असेल तर अनावश्यक व अनाठायी प्रवास, दैवी शास्त्राच्या चुकीच्या वापरामुळे अधोगती, अचानक धंदा बंद करावा लागणं अशी फळं हमखास देतो.

कुणी वापरावं
आपल्याला शनीची साडेसाती वाईट असते हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण राहूची महादशाही कमालीची वाईट असते हे आपणाला ठाऊक आहे काय? त्यात ही महादशा अगदी करियरच्या सुरुवातील म्हणजे २०-२२ व्या वर्षी लागली की काही विचारूच नका. राहुची महादशा १८ वर्षे चालते आणि जातकाला अगदी नको-नको करून सोडते. ज्योतिषाकडे शंकासमाधानासाठी जाणारे ८०% जातक हे राहुच्या महादशेतले असतात एवढंच सांगितलं तर पुरे. राहुला केतुचा चाप बसल्याने राहुच्या महादशेत लसण्या जरूर धारण करावा.

पत्रिकेत केतु ग्रह शुभ भावाचा कार्येश असून त्या भावापासून सहाव्या किंवा आठव्या स्थानी असेल तर लसण्या वापरावं.

अष्टमात केतु असणा-यांना भाजणं, कापणं, अपघात अशा गोष्टींना समोरं जावं लागतं. अशा जातकांनी लसण्या धारण करावा.

•मेष लग्न किंवा रास
केतु ५,६,किंवा ९ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•वृषभ राशी किंवा लग्न
केतु ९ किंवा ११ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•मिथुन रासा किंवा लग्न
केतु ९ किंवा ११ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•कर्क रास किंवा लग्न
केतु ६ किंवा ११ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•सिंह रास किंवा लग्न
केतु ८ किंवा ११ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•कन्या रास किंवा लग्न
केतु ३ किंवा ४ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•तूळ रास किंवा लग्न
केतु २ किंवा ११ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•वृश्चिक रास किंवा लग्न
केतु २,१० किंवा ११ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•धनु रास किंवा लग्न
केतु २,४ किंवा ९ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•मकर रास किंवा लग्न
केतु ४,९ किंवा १२ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•कुंभ रास किंवा लग्न
केतु १० किंवा ११ या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.


•मीन रास किंवा लग्न
केतु २,९ किंवा १० या स्थानात असेल तर लसण्या वापरावा.
लसण्या हे रत्नं आयुष्यभर धारण करू नये. काही विवक्षित काळापुरतंच ते धारण करावं. हे रत्न धारण करू इच्छिणा-यांनी दहा दिवसाचा ट्रायल पिरियड घेणं अत्यंत गरजेचं आहे. या काळात रत्न पातळ पांढ-या कापडात शिवून ते गळ्यात धारण करावं. दहा दिवसात चित्रविचित्र घटना घडली नाही, उत्साही वाटलं, निर्णय योग्य ठरले, शुभसंकेत मिळाले तरच ते अंगठीत किंवा लॉकेटमध्ये धारण करावं अन्यथा बाजूला काढून ठेवावं.

शुद्ध पक्षातील मंगळवारी अश्विनी, मघा किंवा मूळ यापैकी नक्षत्र येत असेल असा दिवस निवडावा. या दिवशी सकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत धारण करावं. रत्न धारण करण्याच्या आदल्यादिवशी रात्रभर गोमुत्रात ठेवावं. सकाळी शुचिर्भुत झाल्यानंतर पूजेची मांडणी करावी. रत्न प्रथम स्वच्छ पाण्यात नंतर मिठाच्या पाण्यात पुन्हा स्वच्छ पाण्यात नंतर गायीच्या कच्च्या दुधात आणि पुन्हा स्वच्छ पाण्यात या क्रमानं धुवावं. पूर्वेकडे तोंड करून पूजेला बसावं. रत्नाला धूप, दीप, अगरबत्ती, फुलं, अक्षता, नैवेद्य, दक्षिणा असा उपचार करावा. नंतर पळीभर पाणी घेऊन
ॐ क्षां क्षीं क्षौं सः केतवे नमः
हा मंत्र म्हणावा व पाणी रत्नावर सोडावं. असं १०८ वेळा करावा. या मंत्राचा जप पूर्ण झाल्यानंतर

पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकम रौद्र रौद्रात्मकंघोरं तं केतु प्रणम्यहम

या मंत्रानं वरील पद्धतीनंच १०८ वेळा जलाभिषेक करावा. जलाभिषेक पूर्ण झाल्यावर तळहातावर पाणी घेऊन कोणत्या कारणासाठी रत्न धारण करतोय त्याचा स्पष्ट उच्चार करीत संकल्प करावा. नंतर रत्न स्वच्छ पुसून धारणं करावं. रत्न अंगठीत धारण करायचं असेल तर सोनं, चांदी किंवा पंचधातुची अंगठी करून करंगळीत धारण करावं. लसण्याबरोबर नीलम, हिरा व पाचू ही रत्नं ज्योतिषांच्या सल्ल्यांशिवाय धारण करू नयेत. तसेच माणिक, पोवळं व मोती ही रत्नं लसण्याबरोबर अजिबात धारण करू नयेत.

शुभं भवतु

3 comments:

Unknown said...

अतिशय सुरेख आणि अभ्यासपूर्ण लेख....

gopal said...

वेगळे काही तरी शिकावयास मिळेल्‍ आवड आहे. काही साहित्य मिळेल का ? अनुभव घ्यावयास शक्य असल्यास side किवा e-mail - केला तरी चालेल शक्य असल्यास बरं का?

kngopalrao@gmail.com
kngopalrao@yahoo.co.in

Unknown said...

अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली ,धन्यवाद