Tuesday, May 18, 2010

पहिला चाफाकर सुबोध भावे यांनी १ मे रोजी साधलेले हितगुज

सर्वप्रथम वाचक रसिकांना माझा सप्रेम नमस्कार

आज १ मे २०१०...५० वर्षापुर्वी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि हे आपल सुवर्णमहोत्सवी वर्ष. महाराष्ट्रात रहाणा-या आणि जगाच्या कानाकोप-यात पसरलेल्या सर्व महाराष्ट्रीयांना माझ्यातर्फ़े मनःपुर्वक शुभेच्छा!

खरचं मला खूप अभिमान वाटतो की या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेण्याचं भाग्य मला लाभलं. महाराष्ट्र म्हणजे ’संतांची भूमी’अस या महाराष्ट्राचं वर्णन केल आहे. महाराष्ट्राच्या त्या थोर संताच्या परंपरेतील, भगवंतांनी रचलेल्या भग्वदगितेला आपल्या प्राकृत भाषेत सांगणारे संत ज्ञानेश्वर, तसेच ज्यांनी पुढाकार घेतला नसता तर आज हा महाराष्ट्र आपला राहिला नसता,आपण हिंदू राहिलो नसतो आणि फ़क्त ज्यांचं नाव घ्यावयाचे म्हटलं तरी अभिमानाने उर भरून येतो असे छत्रपती शिवाजी महाराज,चित्रपटसृष्टीचा उगमस्थान असणारे दादासाहेब फ़ाळके,उत्तुंग अभिनयाने रसिकांना मोहात पाडणारे बालगंधर्व, आपल्या मधुर गायनाने महाराष्ट्राची ख्याती जगाच्या कानाकोप-यात पोहचविणा-या लतादीदी,तसेच चौकार आणि षट्कारांनी अख्ख्या जगाला क्लिन बोल्ड करणारा सचिन तेंडूलकर अशी अनेक विख्यात मंडळी, नामवंत, कलावंत, गुणवंत दिग्गजांची नावे लिहावयाची झाली तर कदाचित कधीच संपणार नाहीत कारण या महाराष्ट्राची मातीच इतकी गुणी आहे की तिच आजपर्यंत आपल्याला घडवत आली आहे आणि अशीच घडवत राहील. म्हणूनच या महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसेल अस वाटत नाही.

परंतु तरीदेखील कुठेतरी प्रश्न पडतो की या महाराष्ट्राचा हा वारसा चालविणार कोण? भ्रष्टाचार, सत्तेचे राजकारण, स्वतंत्र राज्यांची मागणी या समाजविघातक वृत्तींमुळे ही महाराष्ट्राची माती दुखावली तर काय होईल? महाराष्ट्राला स्वतःचे अस्तित्व देणा-यांचे श्रम वाया तर नाही ना जाणार?

याची उत्तर तुमच्याकडे आहेत का?

हा निराशावादी सूर नाही. कारण रात्रीनंतर पुन्हा दिवस उजाडतोच.फ़क्त गरज आहे ते आपला सूर्य आपणच होण्याची.

अभिनेता म्हणून आजपर्यंत तुमच्यासमोर वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमामधून तुम्हाला भेटत आलो, लेखकांनी लिहिलेले संवाद तुमच्यासमोर सादर केले परंतु आज जे मी लिहिले आहे ते माझ्या मनातले बोल आहेत. एका मराठी माणसाचा मराठी माणसाची असलेला संवाद आहे. आणि असा संवाद साधण्याची संधी आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून देणा-या चाफ़ा.कॉमचे मी शतशः आभारी आहे. हे व्यासपिठ निवडण्याच कारण इतकच की महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगाच्या कानाकोप-यात नेण्यासाठी चाफ़ाने आपले एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्रातील नाटकांपासून, लेखांपासून, साहित्यापासून दूर परदेशी राहणा-या लोकांना इथल्या गोडीचा आस्वाद घेता यावा म्हणून चाफ़ाने केलेला हा प्रयत्न खरच कौतुकास्पद आहे. जसा महाराष्ट्रियन असल्याचा मला अभिमान आहे तसाच मला अभिमान आहे की "मी चाफ़ाकर आहे." तुम्हीही "चाफ़ाकर बना" आणि आमच्याबरोबर एक पाऊल पुढे टाका.


आजच्या या पवित्र दिवशी एक शपथ घेऊया या महाराष्ट्राला आपल्या भारतदेशाचे भूषण बनवूया आणि "होतील बहू, असतील बहू, पर या सम हाच" या उक्तीला महाराष्ट्राच्या बाबतीत खरं करूया. ज्यांनी वाहिलेल्या रक्तामुळे या पवित्र महाराष्ट्रभूमीचा जन्म झाला, त्या भुमीला लाज वाटेल असं कुठलंही कृत्यं आपल्या हातून घडू देणार नाही याची काळजी घेवूया.

एकत्र येऊया आणि एकत्र घडवूया महाराष्ट्र आजचा आणि उद्याचा.

आज इतकच...
पुन्हा भेटू पुढच्या महिन्यात
जय महाराष्ट्र



सुबोधचे नविन हितगुज वाचण्यासाठी व त्याला प्रतिक्रिया पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

No comments: